महानगरपालिका सदस्यांमधून महानगरपालिकेने निवडलेला महापौर हा समाजाचा, नागरी एकतेचा मूर्तिमंत प्रतिक आहे. महापौर पदाचा मोठा आदर केला जातो. महापौर पदावरील व्यक्ती वादग्रस्त कृतीपासून अलिप्त असते. यशस्वी महापौरांची मूळ पात्रता म्हणजे त्यांना पक्षीय भेदाभेद न करता मिळविलेली किर्ती. त्यांना कामकाज सुरळीत आणि नियमानुसार चालविण्याकरिता याची अत्यंत आवश्यकता आहे. महापौर कार्यालयाच्या प्रत्यक्ष कामाचा प्रभाव सर्वसाधारणपणे, महानगरपालिकेच्या राजकारणावर आणि धोरणावर पडतो. महापौरांचे व्यक्तीमत्व आणि स्वभाव, त्यांची राजकीय पार्श्वभूमी आणि त्यांच्या कार्यालयाची प्रतिष्ठा त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास त्याचबरोबर सभागृहाच्या कामकाजावर विशेष प्रभाव पाडण्यास पाठबळ देतात.

भारतासारख्या लोकशाही देशात, महापौर हे विविधतेतून एकतेचे प्रतिक आहेत. महापौरांच्या दोन प्रमुख भूमिका आहेत. शहराची प्रतिष्ठा अबाधित ठेवणे आणि महानगरपालिकेच्या सभांची अध्यक्षीय धुरा बाळगण्यासाठी कार्यकारी भूमिका पार पाडणे. महानगरपालिका सभांचा अध्यक्ष म्हणून त्यांना सभागृहाच्या चोहोकडे लक्ष द्यावे लागते. शोभेची भूमिका त्यांना शहराबाहेर आणि जगातील अनेक देशांच्या विविध भागात पार पाडावी लागते. जेव्हा जेव्हा परदेशी प्रतिष्ठीत किंवा अतिविशेष व्यक्ती या शहारस भेटी देतात तेव्हा राज्य सरकारच्या आमंत्रणावरुन नागरिकांच्या वतीने पाहुण्यांच्या आदरसत्काराकरिता त्यांना काम करावे लागते. त्याचबरोबर एखाद्या देशाचा राजा, राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांचा महापौर नागरी सत्कार करतात किंवा त्यांना नागरी मानपत्र देतात, तेव्हा सदर सत्कार किंवा मानपत्र हे बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबईचे नागरिक यांच्या नावे दिला जातो. अशा प्रसंगी महापौर हे प्रथम नागरिक असल्याचे दिसून येते. नागरी, शासकीय इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये महापौरांना प्रतिष्ठेचे पद देखील दिले जाते.